राणीबाग पावसाळ्यासाठी झाली सज्ज

 राणीबाग पावसाळ्यासाठी झाली सज्ज

भायखळ्यातील पालिकेचे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात प्राण्यांची प्रत्येक ऋतूमध्ये काळजी घेतली जाते. उन्हाळ्यात प्राणी पक्षांना गारेगार मेवा दिला जातो, तर पावसाळ्यात त्यांची काळजी घेण्यासाठी पिंजर्‍यातील फांद्यांची छाटणी केली जाते. तसेच शेड्स आणि अन्य गोष्टींची देखील पहाणी केली जाते. यंदा देखील ही सर्व तयारी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाल्याने राणीबाग पावसाळ्यासाठी सज्ज झाली आहे.

राणीबागेत सध्या १३ प्रजातीचे ८१ सस्तन प्राणी, १६ प्रजातींचे १९२ पक्षी, सरपटणार्‍या सात प्रजातींचे २८ प्राणी सध्या राणीबागेचे वैभव आहेत. यामध्ये ३ वाघ, २ बिबटे, २ तरस, २ कोल्हे, २ अस्वले, १ हत्ती, ४ पाणघोडे, २० हरणे, १९ काकर, १ बारशिंगा असे लहानग्यांच्या आकर्षणाचे प्राणी आहेत आणि या सर्वांसाठी नाविण्यपूर्ण आणि आधुनिक असे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.

पिंजरे अत्याधुनिक करण्यापूर्वी प्राण्यांना पावसाळ्यात पिंजर्‍यात बंदीस्त जागेत ठेवण्यात येत होते. मात्र अत्याधुनिकेसोबत, प्रशस्त आणि नैसर्गिक अधिवासाचा आनंद प्राण्यांना मिळावा याची खबरदारी घेण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यात या प्राण्यांना मनसोक्त पिंजर्‍यात वावरता येणार आहे. तसेच पावसाच्या पाण्यात फिरायचे नसेल अशा वेळी त्यांच्यासाठी छताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती राणीबागचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

पिंजर्‍यातील आकर्षक अशी रचना करण्यात आली आहे. अस्वल आणि तरसासाठी २ गुहा, वाघाला मंदिराच्या आकाराची रचना, बिबट्यांसाठी मचांड, तर हरणांसाठी शेडेड अरिया बनविण्यात आला आहे. तर पिंजर्‍यांमध्येच पक्षांसाठी शेड तयार करण्यात आले आहे. धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या असून ड्रेनेजचीदेखील तपासणी करण्यात आली असल्याची माहिती राणीबागेतील जिवशास्त्रज्ञ अभिषेक साटम यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in