
मुंबई : देशात महागाईचा भडका कायम असून, तो जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कायम राहणार आहे, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे.
जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.४४ टक्के नोंदला गेला. त्यामुळे सरकारसकट सर्वांचीच झोप उडाली आहे. आता जुलै ते सप्टेंबर दरम्यान महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. पुरवठ्यामुळे जे अडथळे निर्माण झाले आहेत, ते कमी होण्याची शक्यता दिसत नाही. ऑगस्टचे १५ दिवस भाज्यांच्या किमती वाढलेल्याच आहेत. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत महागाई ६ टक्क्यांच्या वर राहील.
१० ऑगस्टला आरबीआयने पतधोरण बैठकीत यंदाचा महागाई दर ५.१ वरून ५.४ टक्के केला, मात्र १४ ऑगस्ट रोजी सांख्यिकी खात्याने किरकोळ महागाईचा दर ७.४४ टक्के असल्याचे जाहीर केले, तर अन्नधान्याच्या महागाईचा दर ११.५१ टक्के आहे. टोमॅटो, डाळी, गहू, तांदूळ आदींच्या किमती वाढल्या आहेत.
तसेच अल-निनोच्या धोक्याचा इशारा आरबीआयने दिला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात महागाई होऊ शकते. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात कमी झाल्याने त्याचे दर वाढू शकतात. नुकतेच सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या कपातीची घोषणा केली. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसत आहे.