मुंबई : दिवाळी सलग चार दिवस सुट्टी त्यात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयास चार दिवसांत तब्बल एक लाखांहून अधिक पर्यटकांनी पेंग्विन, करिश्मा शक्तीची धमाल मस्ती अनुभवली. तर क्रॉकट्रेल मध्ये मगरीचा थरार अनुभवला. दिवाळीच्या चार दिवसांत एक लाख एक हजार ८६० पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिल्याने पालिकेच्या तिजोरीत ३८ लाख ८ हजार २४५ इतका महसूल जमा झाला. दरम्यान, पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा रक्षकात वाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे ऑनलाईन तिकीट प्रणाली सुरू केल्याने तिकीट खिडकीवर गर्दी कमीच होती, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण. या उद्यान व प्राणी संग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचे ही राणी बाग आकर्षणाचे केंद्र बिंदू. राणी बागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी तर पर्यटकांचा आकडा ३० ते ४० हजारांपर्यंत जातो.
ऑनलाइन तिकीट प्रणालीला पसंती
दिवाळी सणानिमित्त बच्चेकंपनीसह मोठ्यांना सुट्टी होती. त्यामुळे रविवार १२ नोव्हेंबरपासून पर्यटकांची तोबा गर्दी प्राणीसंग्रहालयात झाली. १२ ते १५ नोव्हेंबर या चार दिवसांत तब्बल एक लाखांहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असली, तरी ऑनलाइन तिकीट प्रणालीला पर्यटक पसंती देत असल्याने कर्मचाऱ्यांवर फारसा ताण येत नाही, असेही ते म्हणाले.