गिरगाव चौपाटीवर स्वराज्य भूमी साकारणार लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा

उच्च स्तरीय समितीच्या अहवालानंतर कामाला सुरुवात ; पालिका करणार ९ कोटी खर्च
गिरगाव चौपाटीवर स्वराज्य भूमी साकारणार लोकमान्य टिळकांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. यासाठी गिरगाव चौपाटीवर स्वराज्य भूमी साकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी झाडांवर ग्लो गार्डन लाईटद्वारे लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याचे देखावे साकारले जाणार असून त्यांचा जीवन प्रवास आजच्या तरुण पिढीला उलगडणार आहे. या कामासाठी ९ कोटींचा खर्च अपेक्षित असून, उच्च स्तरीय समितीच्या अहवालानंतर काम सुरू होईल, अशी माहिती भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली. दरम्यान, या कामासाठी २०१२ पासून पाठपुरावा करत असून काम अंतिम टप्प्यात आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. पालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्याच्या जागेवर स्वराज्य भूमी म्हणून विकसीत व्हावी, अशी मागणी २०१२ पासून केली जाते आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले, देशासाठी कारावास भोगला. आपल्या विचारातून, लेखणीतून भारतीय समाजात असंतोषाची ठिणगी पेटवली त्या नेत्याचे गिरगाव चौपाटीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांनी केलेले काम नव्या पिढीच्या स्मरणात राहिल यासाठी या ठिकाणी स्वराज्य भूमी विकसीत करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत बुधवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना खासदार गोपाळ शेट्टी कार्यकर्त्यांसह भेटून चर्चा केली. नामांकित आर्किटेकच्या माध्यमातून ओपन डिझाईन गार्डन निर्माण करून क्रांतीकारी व देशासाठी बलिदान दिलेल्या विरांचे, लोकनेत्यांचे यथोचित स्मारक स्वराज्य भूमी या ठिकाणी विकसीत केली जावी. यामुळे मुंबई शहरात सांस्कृतिक टुरिझमला वाढ मिळेल व नव्या पिढीला याच्यातून प्रेरणा मिळेल, अशी सूचनाही शेट्टी यांनी बैठकीत मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in