गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ८५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण

गाड्यांच्या परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील सुरू झाले असून लवकरच गट आरक्षणासाठी एसटीच्या जादा गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या ८५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनापाठोपाठ एसटी महामंडळाने देखील प्रवासी सेवेसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. नुकतेच या जादा गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील १ हजार ३०० पैकी ८५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

या गाड्यांच्या परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील सुरू झाले असून लवकरच गट आरक्षणासाठी एसटीच्या जादा गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झाल्या असून एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०५ जादा गाड्यांचे आरक्षण २५ जूनपासून सुरू झाले आहे. या जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवासाठी २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान सुटणाऱ्या १ हजार ३०५ जादा गाड्यांपैकी ८५० बसच्या आरक्षणाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३ हजार आसने आरक्षित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. कोकणातून ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान जादा गाड्या परतीचा प्रवास सुरू करतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in