रिक्षा टॅक्सी धावणार नव्या भाडे दरानुसार 

सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणतीही चुकीची भूमिका घेणार नसल्याचे सांगत आणखी भाडेवाढ व्हावी अशी भावना संघटनांकडून व्यक्त
रिक्षा टॅक्सी धावणार नव्या भाडे दरानुसार 

१ ऑक्टोबरपासून रिक्षा, टॅक्सीची नवीन भाडेवाढ लागू होणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार रिक्षाचे भाडे २ रुपयांनी तर टॅक्सीचे भाडे ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहे. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून भाडेवाढीची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे शासनाकडून १ ऑक्टोबरपासून भाडेवाढ करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला खटुआ समितीच्या अहवालानुसार भाडेवाढ करावी अशी मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून कायम असून तात्काळ सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणतीही चुकीची भूमिका घेणार नसल्याचे सांगत आणखी भाडेवाढ व्हावी अशी भावना संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.      

नव्या भाडेदर पत्रकानुसार रिक्षातून दिवसा पाच किलोमीटरच्या प्रवासासाठी ७७ रुपये, तर टॅक्सीसाठी ९३ रुपये द्यावे लागणार आहेत. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यासाठी संपाचा इशाराही दिला होता. अखेर परिवहन विभागाने भाडेवाढीस मंजुरी दिली. रिक्षाच्या भाडय़ात पहिल्या दीड किलोमीटरसाठी दोन रुपये, टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे रिक्षाचे भाडे आज १ ऑक्टोबरपासून २१ रुपयांवरून २३ रुपये, टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये होणार आहे. रिक्षातून रात्री १२ नंतर दीड किलोमीटर प्रवास करण्यासाठी २७ रुपयांऐवजी २९ रुपये आणि टॅक्सीसाठी ३२ रुपयांऐवजी ३५ रुपये आकारण्यात येणार आहेत. दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सीची नवीन भाडेदर लागू करताना मीटरमध्ये बदल करावे लागणार असून हे बदल होईपर्यंत चालकांना नवीन भाडे दरपत्रक देण्यात येणार आहे. त्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यास परिवहन विभागाने आकारलेले अधिकृत दरपत्रक पाहता येईल. त्यामुळे प्रवाशाची फसवणूक होणार नाही अशी माहिती परिवहन विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in