
मुंबई : मुंबईतून वरुणराजाने माघार घेतल्यानंतर उकडा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होईल, असे वाटतं असताना १५ ते २२ ऑक्टोबर या एका आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात साथीच्या आजारांचा धोका कायम आहे. दरम्यान, दरम्यान, साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ४२ लाख ७५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. यात ६७ हजार ८० लोकांचे ब्लड सॅपल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी गेली चार महिने मुंबईकर हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात ही साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीचे आजार पावसाने माघार घेतल्यानंतर संख्या कमी होईल, असे वाटत होते; मात्र मुंबईतून पाऊस गेला असला तरी मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू या आजारांच्या रुग्ण संख्येत आठवडाभरात दुपटीने वाढ झाली आहे. १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान मलेरिया - ४१८, डेंग्यू - २५०, लेप्टो - ११ रुग्ण आढळले आहेत. तर १५ ते २२ ऑक्टोबर या आठ दिवसांत मलेरिया - ६८०, डेंग्यू -७३७ लेप्टो - ३२, स्वाईन फ्लू - ५१ रुग्णांची नोंद झाल्याने साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे
दरम्यान, १५ ते २२ ऑक्टोबर या आठ दिवसांत ८ लाख ५५ हजार घरांची झाडाझडती घेतली असून, ४२ लाख ७५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ६७ हजार ८० लोकांचे ब्लड सॅपल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
अँनोफिलीस डासांच्या ५४ हजार ८८१ उत्पत्ती स्थानांचा शोध
मलेरिया प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या अँनोफिलीस डासांच्या ५४ हजार ८८१ उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला असता, १,८०९ ठिकाणी अँनोफिलीस डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली, तर डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी १२ लाख ९ हजार ५७ कंटेनरची तपासणी केली असता, १४ हजार ८२२ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
१ ते २२ ऑक्टोबर दरम्यान रुग्णसंख्या
मलेरिया - ६८०
डेंग्यू - ७३७
लेप्टो - ३२
गॅस्ट्रो - २६३
कावीळ - ३१
चिकनगुनिया - २४
स्वाईन फ्लू - ५१