संभाजीराजे छत्रपती यांनी केली 'स्वराज्य' या संघटनेची स्थापना

संभाजीराजे छत्रपती यांनी केली 'स्वराज्य' या संघटनेची स्थापना

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, यावर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, गुरुवारी ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगे समजू नये, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. संभाजीराजे म्हणाले, ‘राजकारणविरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कोणाला होतो आहे न पाहता समाजाचे हित पाहिले. त्यामुळे माझा अधिकार बनतो की सर्वांनी अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणे गरजेचे आहे. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवे आणि मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल घेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावे, अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही’, असे संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करत आहोत, असे सांगत त्यांनी या संघटनेचे नाव ‘स्वराज्य’ असेल, असे सांगितले. संघटनेच्या छताखाली सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘२००७ पासून २०२२ पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले ५-६ दिवसच जातो. पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्त्वाची आहे, त्यामुळे हे दोन निर्णय मी घेतले आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी बोलताना हा आपल्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असल्याचं सांगतानाच संभाजीराजे भोसले यांनी निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेत दिले.

Related Stories

No stories found.