संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, देशपांडेंचा गाडी चालक वैश्य आणि शाखाध्यक्ष साळी यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांनी संदीप देशपांडे आणि धुरी यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर अटकेत असलेल्या देशपांडेंचा गाडी चालक वैश्य आणि शाखाध्यक्ष साळी या दोघांची १५ हजारांच्या जामीनावर सुटका केली.

राज ठाकरे यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले होते. ४ मे रोजी ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता दोघे गाडीतून पळून गेले. गाडी भरधाव वेगात चालवल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी देशपांडेंसह गाडी चालक, शाखाध्यक्ष संतोष साळी आणि संतोष धुरीविरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

अटकेची टांगती तलवार असल्याने दोघांनीही सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती पी.बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने अर्जाला जोरदार विरोध केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश पी.बी.जाधव यांनी राखून ठेवलेला निर्णय गुरुवारी जाहीर केला. न्यायालयाने देशपांडे आणि धुरी यांना १५ हजाराचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करताना २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. तसेच या खटल्याचा तपास पूर्ण होईपर्यंत दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला पोलीस ठाण्यात उपस्थित राहणे अनिवार्य करताना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही दिले. तपासाला सहकारी न केल्यास त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांना न्यायालयात जामीनाला आव्हान देण्याची मुभाही न्यायालयाने दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in