
शिवसेना ठाकरे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंबद्दल नेहमीच आदर आहे, पण त्यांनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना पुन्हा एकसंध होईल असे म्हंटले. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर देताना, गद्दारांनी आत्मपरीक्षणाचा सल्ला देऊ नये, असे सडेतोड उत्तर दिले. तयावेळी त्यांनी, लवकरच शिंदे गटातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावाही केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "आत्मपरीक्षणाची गरज आम्हाला नाही, तर शिंदे गटालाच आहे. गद्दारांनी आम्हाला आत्मपरीक्षणाबद्दल सांगू नये. अब्दुल सत्तारांनी देखील माझ्याच पक्षातील नेत्याचा माझ्याविरोधात कट आहे, असा आरोप केला. त्यामुळे केसरकरांनी आणि त्यांच्या गटानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शिंदे गटातील धूसफूस समोर येत आहे. त्यांच्या गटामध्ये आणखी गट पडू लागले आहेत. त्यामुळे हे सरकार आता अधिक काळ टिकू शकत नाही. तसेच, आता या आमदारांचे परतीचे मार्ग बंद झाल्याने त्यांना भाजपशिवाय दुसरा पर्याय उरला नाही." अशी टीका त्यांनी यावेळी केली.