पक्षाचे नाव, चिन्ह मिळविण्यासाठी इतक्या कोटींचे डील; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने आता ठाकरे गटाकडून त्यावर जोरदार टीका
पक्षाचे नाव, चिन्ह मिळविण्यासाठी इतक्या कोटींचे डील; संजय राऊतांच्या गंभीर आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्याने आता ठाकरे गटाकडून त्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी तब्बल २ हजार कोटींचा करार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आता शिंदे गटाला मिळाले आहे. त्यावर पहिल्याच दिवसापासून उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोग तसेच न्यायालयावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. आता संजय राऊत यांनी तर थेट या प्रकरणी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप ट्विटमार्फत केला. या ट्विटमध्ये त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा फोटो आणि कवितेच्या ओळीही शेअर केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगावर त्यांनी गंभीर आरोपही केले. "माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि शंभर टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात कधीच असे घडले नव्हते,’’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यावर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्विट करून प्रत्युत्तर दिले. त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या केसरीतील अग्रलेखाचा संदर्भ दिला. "विचारशक्तीस अनावर सोडून जे जे तरंग निघतील, ते लेखणीने अगर तोंडाने सांगणाऱ्या गृहस्थात आणि वेड लागून किंवा गांजा पिऊन बडबडणाऱ्या व्यक्तीत काही विशेष फरक असल्याचे आम्ही मानत नाही," असा अग्रलेखातील उतारा शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in