मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ या संकल्पनेवर आधारित व्याख्यान ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील गुलजारीलाल नंदा सभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आले.
याप्रसंगी म्हाडातील कर्मचार्यांना मार्गदर्शन करतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या सहाय्यक पोलिस आयुक्त मनीषा झेंडे म्हणाल्या की, “३१ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. भ्रष्टाचारामुळे देशाच्या विकासाची गती मंदावते. भ्रष्टाचार कॅन्सरच्या आजाराप्रमाणे देशाची सामाजिक, आर्थिक चौकट पोखरत आहे. ज्यामुळे समाजाचे संतुलन बिघडत आहे. पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासन प्रस्थापित करण्याकरिता भ्रष्टाचार निर्मूलन ही काळाची गरज आहे व त्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे.”
या कार्यक्रमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश पोवार, पोलीस निरीक्षक इम्रान इनामदार, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, उपमुख्य अभियंता महेश जेस्वानी, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, मुंबई मंडळाच्या उपमुख्य अधिकारी कमल पोवळे आदी उपस्थित होते.