पालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा

महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे
पालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा

मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्यासाठी निविदा काढण्यात आली, मात्र यात पारदर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आणि तांत्रिक सल्लागाराच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाल्याचा दावा शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेच्या अटी-शर्ती या एका विशिष्ट कंत्राटदाराला कंत्राट मिळावे, अशाप्रकारे होत्या. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक बाब असल्याने त्या विषयातील तज्ज्ञ व तांत्रिकदृष्टया सक्षम असलेल्या कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते. परंतु त्या कंपनीकडे सदर कामाचा कोणत्याही स्वरुपातील अनुभव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकूणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो. सदर निविदेबाबत आयटी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, तांत्रिक सल्लागार आणि सदर कंपनीचे अधिकारी यांच्यात वारवांर संभाषण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशाप्रकारचे संवाद का झाले? त्यांच्यात झालेले हे संवाद थेट भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत, त्याबाबतच्या तक्रारी पालिकेकडे व लाचलुचपत विभागकडेही करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in