
हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून आमदार संतोष बांगर हेच काम पाहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही; पण कोणी वाटेला आले, तर शिवसैनिक कधी सोडतही नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मी, मुख्यमंत्री झालो असलो तरी मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. तुमच्या कुटुंबातलाच एक माणूस सहाव्या मजल्यावर बसला आहे, असे समजा. हे सरकार सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील पाऊस, अतिव़ष्टी आणि पूरस्थितीवर माझे पूर्ण लक्ष असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे अगदी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ऐनवेळी शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यानंतर बांगर यांना शिवसेनेने हिंगोली जिल्हाप्रमुख-पदावरून हटविले होते. बांगर यांनी जिल्ह्यातील आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह सह्याद्री अतिथीगृह येथे येऊन शक्तिप्रदर्शन केले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाहेर येऊन हिंगोलीच्या जिल्हाप्रमुखपदावर संतोष बांगरच असतील, त्यांनी आणखीन जोमाने काम करावे, असे जाहीर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आज राज्यातील जनतेला देखील हे सरकार आल्याचे समाधान आहे. संतोष बांगर यांनी अतिशय चांगले कार्य केले आहे. कोविडकाळात तर त्यांनी स्वत:ची एफडी मोडून जनतेसाठी पैसा खर्च केला. आतादेखील बांगर हेच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.