भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स वधारला

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा पाहता रुपया फारसा मजबूत झाला नाही
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स वधारला

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स ३२७ अंकांनी वधारला. आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर आदींच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने बाजाराला बळ मिळाले. बँका, एफएमसीजी यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली आहे. तथापि, विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा पाहता रुपया फारसा मजबूत झाला नाही.

दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३२६.८४ अंक किंवा ०.६२ टक्का वधारुन ५३,२३४.७७ वर बंद झाला. दिवसभरात त्याने ३९४.०६ अंक किंवा ०.७४ टक्का वधारुन ५३,३०१.९९ ची कमाल पातळी गाठली होती. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीही ८३.३० अंक किंवा ०.५३ टक्का वाढून १५,८३५.३५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडस‌्इंड बँक, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड आणि एसबीआय यांच्या समभागात वाढ झाली. तथापि, टीसीएस, टाटा स्टील आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात टोकियो, शांघायमध्ये सकारात्मक तर सेऊलमध्ये नकारात्मक वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.५० टक्का घटून प्रति बॅरलचा भाव १११ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातून २,३२४ .७४ कोटींच्या समभागांची विक्री केली.

रुपयात फारसा बदल नाही

भारतीय चलन बाजारात रुपयात फारसा बदल न होता ७८.९४ वर बंद झाला. सोमवारच्या व्यवहारात सकाळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७८.९७ वर उघडला. दिवसभरात तो ७९.०६ ही नीचांकी पातळीवर गेला होता. मात्र, दिवसअखेरीस शुक्रवारच्या तुलनेत फारसा बदल न होता ७८.९४ वर बंद झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in