मुंबई : जुहू येथील ‘कॉसमिक स्पा अँड सलून’मध्ये बुधवारी सायंकाळी जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई करून तिथे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी स्पाच्या मालकिणीसह मॅनेजर महिला शालिनी धोत्रे आणि निकिता कारंडे यांच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने सोमवार ३० ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका करुन त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.
जुहू येथील जेव्हीपीडी, आरोग्यनिधी हॉस्पिटलजवळ आशियाना अपार्टमेंटमध्ये कॉसमिक नावाचे एक स्पा आणि मसाज पार्लर आहे. या स्पामध्ये काम करणाऱ्या महिलेच्या मदतीने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे एक बोगस ग्राहक पाठविला होता. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी तिथे छापा टाकला होता. यावेळी घटनास्थळाहून पोलिसांना तीन तरुणी सापडल्या. या तरुणींच्या चौकशीतून शालिनी धोत्रे आणि निकिता कारंडे या त्यांच्या मदतीने तिथे सेक्स रॅकेट चालवित असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.
गुन्हा दाखल होताच मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली आहे. या तिघींनाही नंतर मेडिकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडिकलनंतर त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली. या गुन्ह्यांत स्पा मालकीणीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.