भविष्यात शरद पवार, उद्धव ठाकरेंचेच राजकारण चालेल- संजय राऊत

संजय राऊत यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून वाढदिवस व भाऊबीजेच्या राऊतांना शुभेच्छा दिल्या.
भविष्यात शरद पवार, उद्धव ठाकरेंचेच राजकारण चालेल- संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रात याआधीही शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोनच नेत्यांचे राजकारण चालायचे. त्यानुसारच भविष्यात महाराष्ट्रात दोनच नेत्यांचे राजकारण चालेल. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे. अजित पवार आणि शरद पवार हे कितीही एकत्र आलेले दिसले तरी येत्या २०२४ च्या निवडणुकांत शरद पवार हे अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला.

बारामती येथे दिवाळी निमित्त अजित पवार आणि शरद पवार हे कुटुंबियांसोबत एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. दोघांच्या एकत्र येण्यासाठी कौटुंबिक आणि सणावाराची पार्श्वभूमी असली तरी गेल्या काही दिवसांत दोन्ही गटांत जे शाब्दिक युदध झाले होते त्या पार्श्वभूमीवर या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबददल पत्रकारांना प्रतिक्रिया देताना संजय राउत म्हणाले, मी शरद पवार यांना ओळखतो. आज शरद पवार,अजित पवार कितीही एकत्र आलेले दिसत असले तरी २०२४ च्या निवडणुकांत शरद पवार हे अजित पवार गटाला माती चारतील हे निश्चित आहे. मागच्या काळात महाराष्ट्रात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोनच नेत्यांचे राजकारण चालायचे. आज बाळासाहेब हयात नाहीत. यापुढेही महाराष्ट्रात शरद पवार आणि उदधव ठाकरे यांचेच राजकारण चालेल. हे दोघेच महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी होतील. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्याच विचारांची मशाल पुढे घेउन निघाले असल्याचे राउत म्हणाले.

संजय राऊत यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सुषमा अंधारे यांनी पत्र लिहून वाढदिवस व भाऊबीजेच्या राऊतांना शुभेच्छा दिल्या. राऊत यांनी सुषमा अंधारे यांचे कौतुकही केले. निष्ठा हा आमचा प्राण आहे. महाराष्ट्राला, मराठी माणसाला स्वातंत्र्याने जगण्याचा ज्या पक्षाने मंत्र दिला, त्या पक्षावर निष्ठा ठेवणे हे महाराष्ट्राशी निष्ठा ठेवण्यासारखे असल्याचे मी मानतो. सत्ता येते, सत्ता जाते पण संकट आले म्हणून बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना स्थान नाही, असेही राऊत म्हणाले. गेल्या वर्षीची दिवाळी तुरुंगात गेली. वाढदिवसाच्या एकदोन दिवस आधी सुटलो. काळ खडतर आहे. पण, दिवस बदलत असतात. तुमचा आत्मविश्वास महत्वाचा असतो. काही लोक पडता काळ आला की पळून जातात. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसोबतच्या माणसांना तुम्ही बघितले असेल असेही राउत म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणूका होणार आहेत. त्यात काँग्रेसचा विजय होईल. अपेक्षेप्रमाणे निकाल लागले तर २०२४ च्या निवडणुकीचे चित्र बदललेले असेल, असेही राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in