शरद पवार देणार संभाजीराजेंना पाठिंबा राज्यसभेचा मार्ग मोकळा

शरद पवार देणार संभाजीराजेंना पाठिंबा राज्यसभेचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीची एक जागा निवडून राहिलेली मते छत्रपती संभाजीराजेंना देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अन्य राजकीय पक्ष आणि आमची यासंदर्भात अजून काही चर्चा झालेली नाही, असेही यावेळी शरद पवारांनी म्हटले आहे. आमच्याकडे एक उमेदवार निवडून आल्यानंतर उरलेली १० ते १२ मते आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना देणार आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अपक्ष आमदार बालदी यांचाही पाठिंबा

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार, अशी घोषणा केली होती. संभाजीराजेंच्या उमेदवारी अर्जावर रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी पहिली सही केली. राज्यातून संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष आमदाराचा मिळालेला हा पहिला पाठिंबा आहे.

राज्यात राज्यसभेच्या

६ जागांसाठी निवडणूक

येत्या १० जूनला राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात भाजपकडे २ तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक-एक जागा येणार असून सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in