वसई -विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी शर्मिला ठाकरे आक्रमक ; म्हणाल्या, "एक केस घ्यावी लागली..."

यावर्षी पाऊस चांगला पडूनही वसई विरारकरांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे
वसई -विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी शर्मिला ठाकरे आक्रमक ; म्हणाल्या, "एक केस घ्यावी लागली..."

वसई - विरारच्या रहिवाश्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठीचं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी वसई -विरारकरांच्या पाण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेवर महामोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. वसई-विरारकरांच्या पाणी प्रश्नासाठी एक केस घ्यावी लागली तरी चालेल असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी त्यावेळी केलं.

वसई-विरारकरांना पाण्याची तीव्र टंचाई होत आहे. वसई-विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात मुबलक पाणी आहे. वसई -विरारला पाणी पुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त 165 एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यातील 80 एमएलडी आता मिळू शकते. मात्र, नेत्यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्यानं अतिरिक्त पाणी वितरीत होत नाही आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आक्रमक झाले असताना, आज शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. या भव्य मोर्चेमध्ये मोठ्या प्रमाणांत महिलांचा समावेश होता. काही महिला डोक्यावर कळशी घेऊन सहभागी झाल्या होत्या.

'एबीपी' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, येणाऱ्या पाच दिवसात वसई- विरारकरांना अतिरिक्त मिळणारा पाणी पुरवठा सुरू केला नाही तर, मनसेचे सर्व पदाधिकारी स्वतः पाणीपुरवठा सुरू करतील. त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठी माझ्यावर एक केस झाली तरी चालेलं, असं आक्रमक वक्तव्य शर्मिला ठाकरेंनी केलं आहे.

यावर्षी पाऊस चांगला पडूनही वसई विरारकरांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन ते तीन दिवस पाणी येत नाही. त्यामुळे विशेषतः महिला वर्गाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी वसई-विरारमध्ये पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. या पाणी प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी महिला वर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in