
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडियो मॉर्फकरून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलेच तापले. यासंदर्भात ठाकरे गटाचे २ जण आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कांदिवली येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या काँग्रेस कार्यकर्त्यालादेखील मारहाण केल्याची घटना समोर आली.
या सर्व प्रकारानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला असून शीतल म्हात्रे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, "एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही बाहेर पडलो. तेव्हापासून आम्ही ट्रोलिंगला सामोरे जात आहोत. तरी देखील आम्ही उत्तर दिले नाही. मात्र ज्या पद्धतीने व्हिडीयो काढून त्यावर गाणे टाकून ते मातोश्री फेसबुक पेजवर शेअर करण्यात आले. ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकारी आणि फेसबुक पेजवर ते व्हायरल करण्यात आले." असा गंभीर आरोप त्यांनी केला.
"स्त्रिच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल, तर चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. यापूर्वीही घोसाळकरांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी मी तेव्हा ठाम राहिले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितले होते, पण त्यांनी ऐकले नाही. मात्र या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला.आणि ते म्हणाले की, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे' असा धीर दिला." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. फक्त मुंबई, पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडियो शेअर केला असे तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत, असेदेखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापणार आहे.