शिंदे-ठाकरेंमध्ये लवकरच समेट घडणार ?

शिवसेनेला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली असून आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत
शिंदे-ठाकरेंमध्ये लवकरच समेट घडणार ?

आम्ही शिवसेनेतच असून उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत, असे बंडखोर शिवसेना नेत्यांचे पालुपद गेल्या अनेक दिवसांपासून कानी पडत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनीही बंडखोर नेत्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. आता एकनाथ शिंदे हे आमचे मित्रच आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले, तसेच शिवसेना हे कुटुंब असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे. येत्या दोन दिवसांत त्यांच्यात चर्चा होईल, असे ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केल्यामुळे शिंदे-ठाकरेंमध्ये लवकरच समेट घडून येईल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. “शिंदे गट आणि आम्‍ही एकत्र यावे, असे कोणाला वाटणार नाही. अनेक वर्षांपासून ते आमचे सहकारी, मित्रच राहिले आहेत.अनेक वर्षे आमचे जिव्हाळयाचे संबंधच राहिले आहेत. मात्र हे काळच ठरवेल,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. मात्र एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होईल, असे ट्वीट करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी काळजीपूर्वक विधाने करावीत, अशा शब्दांत राऊतांनी त्यांचे कानही उपटले.

दिपाली सय्यद यांनी शिंदे गट व शिवसेना एकत्र यावेत, यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली. “लवकरच दोघांमध्ये भेट होणार असून कुठेतरी काहीतरी अडते आहे. शिवसेना एक कुटुंब असून या कुटुंबाची सदस्‍य या नात्याने मी पुढाकार घेतला आहे. कुठेतरी दोन्ही गटाचे ईगो आड येत असावेत म्‍हणून प्रयत्‍न करणे गरजेचे आहेत,” असे दीपाली सय्यद यांनी म्‍हटले आहे. मात्र नेमकी शिंदे-ठाकरे भेट कधी होणार, हे त्‍यांनी स्‍पष्‍ट केलेले नाही. तसेच शिंदे वा ठाकरे यांच्याकडूनही तसे कोणतेच संकेत मिळालेले नाहीत. मात्र त्यांच्या या ट्वीटमुळे खरोखरच शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात हा पर्याय कितपत यशस्‍वी ठरेल, याबाबतही साशंकता आहे. कारण शिवसेनेला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली असून आमदारांपाठोपाठ खासदारही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.

तुटलेले घर एकत्र यावे -दीपाली सय्यद

“शिवसेना हे एक घर आहे आणि त्यात आता दोन वेगवेगळे गट झाले आहेत. हे तुटलेले घर एकत्र यावे, एवढीच माझी इच्छा आहे. मी एक शिवसैनिक म्हणून काम करते. माझ्यावर कारवाई होण्याचा संबंध येत नाही. मी आजपर्यंत मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. ते मोठे नेते असून एकत्र येतील किंवा वेगळे होऊ शकतात. छोट्या कार्यकर्त्यांपासून आमदारांपर्यंत त्यांच्या मनातील इच्छा मांडत आहेत. दोन्ही गटांनी एकत्र येण्यातच हित आहे. दीपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांनी एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. सर्व आमदारांच्या मनात हीच भावना आहे. कुटुंबप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीही मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचे म्हटले आहे. मानापमनाच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. मात्र, कुठेतरी गोष्ट अडली आहे ती जोडण्याचे काम मी करत आहे,” असे शिवसेना नेत्या दीपाली सय्यद म्हणाल्या.

खासदार मंडलिक गटही शिंदेगटात

शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे, अशी मागणी मंडलिक समर्थक गटाने केली. हमिदवाडा कारखान्यावर रविवारी मंडलिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही आग्रही एकमुखी भूमिका मांडण्यात आली. तसेच निर्णयाबाबतचे सर्वाधिकार खासदार मंडलिक यांना देण्यात आले. रोहित संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या मंडलिक गटाने कोल्हापुरात हात उंचावून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in