राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार संभाजीराजेंच्या प्रयत्नाला सुरुंग लागणार ?

राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार संभाजीराजेंच्या प्रयत्नाला सुरुंग लागणार ?

राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे छत्रपती संभाजीराजे यांना शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर करून २४ तास उलटण्यापूर्वीच शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना मोठा धक्का बसला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी याबाबतची घोषणा केली. शिवसेनेच्या या निर्णयामुळे संभाजीराजेंच्या राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडून जाण्याच्या प्रयत्नाला सुरुंग लागणार आहे.

महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठी जून महिन्यात निवडणूक होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार आणि महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. त्यामुळे भाजप आणि आघाडीची उर्वरित मते घेऊन सहाव्या जागेवर अपक्ष म्हणून निवडून जाण्याचा संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. तत्पूर्वी, उर्वरित सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा सांगितला आहे. शिवसेनेच्या निर्णयाने संभाजीराजेंची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. “आपण अपक्ष म्हणून राज्यसभेत जाणार आहोत, त्यासाठी मला सर्वपक्षीयांनी मदत करावी,” असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे; मात्र त्यांची उमेदवारी भाजपच्या रणनीतीचा भाग असू शकते, असा अंदाज महाविकास आघाडीतील नेत्यांचा आहे. त्यामुळे संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचे चित्र आहे. राज्यसभेसाठी शिवसेना दोन उमेदवार उभे करणार आहे. संजय राऊत यांची फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यात आता परब यांच्या घोषणेने शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

आकड्यांचं गणित...!

भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार, अशा एकूण ११३ आमदारांचे वजन भाजपकडे आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांचा कोटा किती असावा, यासाठीचे एक सूत्र आहे. त्यानुसार एका खासदारांसाठी सरासरी १४ आमदारांच्या मतांची गरज आहे. एकंदरच महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता सहाव्या जागेसाठी सत्ताधारी महाविकास आघाडीला आणि भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.

सर्वपक्षीय आमदारांना आवाहन
संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभेतील सर्व पक्षीय आमदारांना पत्र पाठवून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मी २००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार असताना कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in