शिवसेनेचा सावध पवित्रा,नेत्यांकडून प्रतिज्ञापत्रावर घेतल्या सह्या

आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांच्याकडून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात येत आहेत
शिवसेनेचा सावध पवित्रा,नेत्यांकडून प्रतिज्ञापत्रावर   घेतल्या सह्या

जवळपास ३९ आमदारांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शिवसेना आता खडबडून जागी झाली आहे. आता सावध पवित्रा घेत शिवसेना नेतृत्वाने आपल्या नेत्यांकडून प्रतिज्ञापत्रावर आपल्या प्रामाणिकतेची शपथ घेतली आहे. आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांच्याकडून प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात येत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदारांनी बंडखोरी करत विरोधी पक्षात असलेल्या भाजपसोबत युती केल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. बंडखोर अजूनही शिवसेना पक्षातच असल्याचा दावा करत असल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. बंडानंतर भविष्यात कोण बंडखोरी गटात सामील होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. बंडखोरीला स्थानिक पातळीवर शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख यांचा पाठिंबा मिळण्याची भीती पक्षनेतृत्वाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाने आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुख यांच्या सह्या असलेले प्रतिज्ञापत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे म्हणाले की, “प्रतिज्ञापत्र सही करण्यात काहीही चुकीचे नाही. माझा शिवसेना आणि उद्धव साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. प्रतिज्ञापत्रावर हे सर्व लिहून त्यावर स्वाक्षरी करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. नव्याने आलेले सरकार जास्त काळ टिकणार नाही. ते लवकरच कोसळेल. भाजपला शिवसेना संपवायची आहे, पण आम्ही त्यांना तसे करू देणार नाही. मी पक्ष आणि उद्धव साहेबांप्रति माझा पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो.” शिवसेना भवनातून प्रतिज्ञापत्राच्या प्रती आमच्या शाखेत आल्या असल्याचे दोन नगरसेवकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. सर्व शाखाप्रमुख आणि विभागप्रमुखांना त्यावर स्वाक्षऱ्या करावयाच्या आहेत. कायदेशीर लढाई लढण्याकरिता अशा प्रतिज्ञापत्राची गरज असल्याचे पक्षप्रमुखांना वाटत आहे. आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत कायम असू, असेही त्यांनी सांगितले. यावर टीका करताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी शिवसैनिकांकडून हातावर शिवबंधन बांधून घेण्यात येत होते. आता ते प्रतिज्ञापत्र घेत आहेत. हे काय आहे, हे कुणीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या हिंदुत्ववादी विचारांचे मी पालन करेन, असे या प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे लिहून घेतील काय?”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in