राज्यसभेवर जाण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेची साथ

राज्यसभेवर जाण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेची साथ

संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवर जाण्यासाठीचा मार्ग शिवसेनेच्या स्त्यावरूनच जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. आत्तापर्यंत भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी आता अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाण्याचा निर्धार बोलून दाखवला होता. तसेच, सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते; मात्र शिवसेनेने त्यांना पक्षात आल्याशिवाय पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर, गुरुवारी त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यासंदर्भात आता तर्क-वितर्कांना उधाणा आले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच संभाजीराजे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे या चर्चेला बळ मिळाले; मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या रस्त्यानेच राज्यसभेत जावे लागण्याची शक्यता आहे.

“शिवसेनाप्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवेल. संभाजीराजे शिवसेनेचे उमेदवार होणार असतील, तर त्या बाबतीत नक्कीच विचार केला जाईल. छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहेत. आमची भूमिका आहे की दुसऱ्या जागेवर देखील शिवसेनेचाच उमेदवार निवडून यावा,” असे सूचक वक्तव्य करून संजय राऊत यांनी संभाजीराजे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याशिवाय पर्याय नसल्याचे संकेतच दिले आहेत. राज्यसभेच्या नियमानुसार दर दोन वर्षांनी सहा सदस्यांची टर्म संपून त्या जागी नव्या सदस्यांची निवड केली जाते. यानुसार संभाजीराजे छत्रपती यांची देखील टर्म संपत असून त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याची त्यांची इच्छा आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in