मुंबई : दादर पश्चिम येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान धूळ मुक्त करण्यासाठी आयआयटी मुंबईचा सल्ला घेण्यात येणार आहे. यासाठी लवकर न उडणाऱ्या मातीच्या वापरणासाठी आयआयटीच्या ‘जिओ कन्सलटंट’ची मदत घेतली जाईल. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी आयआयटीचा सल्ला घ्यावा, कायमस्वरुपी यावर उपाय करण्यात यावे, अशी सूचना राज ठाकरे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान खेळांसह दिग्गज नेत्यांच्या ऐतिहासिक सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सचिन तेंडुलकर सारखे दिग्गज खेळाडू तयार झाले. सध्या ही दररोज सुमारे दहा हजारांवर खेळाडू येत असतात. रोज शेकडो नागरिकही मॉर्निंग वॉक, फिरण्यासाठी येत असतात. शिवाजी पार्क मैदान २८ एकर आणि १.२ किमीचा परीघ अशा विस्तीर्ण परिसरात पसरलेले असल्याने हवे सोबत धुळीचे कण पसरतात. यामुळे धूळ प्रदूषण होते आणि याचा त्रास परिसरातील रहिवाशांनाही होत असल्याने पालिकेकडून मैदान धूळमुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी मैदानावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत; मात्र सकाळी १० नंतर उन्हाचा जोर वाढल्यानंतर पुन्हा धूळ उडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मैदान कायमस्वरूपी धूळमुक्त करण्यासाठी पालिकेकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येणार आहेत.