मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे

मुंबई महापालिकेत शिवसेनेला भगदाड पाडण्याचे काम केल्याची चर्चा पालिकेत रंगू लागली आहे
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेचे चेहरे म्हणून ओळख निर्माण झालेले नगरसेवक ते आमदार यांनी शिवसेना विरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतल्या नेत्यांच्या बंडाळीने मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेमुळे मुंबई महापालिकेत चार टर्म स्थायी समितीवर आपला दबदबा ठेवला, असे यशवंत जाधव व त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देत मुंबई महापालिकेत शिवसेनेला भगदाड पाडण्याचे काम केल्याची चर्चा पालिकेत रंगू लागली आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिंदे यांनी बंडाळी केली आणि बंडखोर आमदारात यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत आले आहे. यामिनी जाधव या शिवसेना नगरसेविका म्हणून चर्चेत होत्या. तर यामिनी जाधव यांनी २०१९ मध्ये भायखळा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवली आणि विजयी झाल्या. विशेष म्हणजे यामिनी जाधव यांनी एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांना पराभवाची धूळ चारत मातोश्रीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर भायखळा मतदार संघातून यशवंत जाधव यांनी चारवेळा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत; मात्र शिंदे यांनी बंडाळी केली आणि यामिनी जाधव यांना सुरतपर्यंत सोडण्यासाठी यशवंत जाधव गेल्याची चर्चा रंगू लागली आहे. कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव, उपनेते यशवंत जाधव चार वर्षे स्थायी समिती उपभोगली. तर उत्तर मुंबईतील मोठे नाव प्रकाश सुर्वे यांनीही शिंदे यांना समर्थन दिल्याने मागाठाणा येथील नगरसेवक सुर्वे यांच्या पाठिशी उभे राहतील, असे चर्चा आहे. ही सगळ्या नेत्यांनी आपला प्रवास शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून सुरु केला आणि आमदारापर्यत पोहोचले. मात्र शिंदे यांनी बंडाचे हत्यार उपसले आणि या नेत्यांनी बंडाळी केल्याने भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार, अशी चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in