आतापर्यंत आम्‍ही जावईहट्ट पुरविला आहे. आता जावयांनी आमचा हट्ट पुरविला पाहिजे

नार्वेकर कोणत्‍याही पक्षात गेले की ते त्‍या पक्षनेतृत्‍वाच्या अगदी जवळ जातात
आतापर्यंत आम्‍ही जावईहट्ट पुरविला आहे. आता जावयांनी आमचा हट्ट पुरविला पाहिजे

राज्‍यातील राजकीय वातावरणात तणाव असला तरी अजित पवार यांनी विधानसभेत राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनपर प्रस्‍तावावेळी बोलताना तुफान फटकेबाजी केली. ‘‘राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. म्‍हणजे ते आमचेच जावई आहेत. आतापर्यंत आम्‍ही जावईहट्ट पुरविला आहे. आता जावयांनी आमचा हट्ट पुरविला पाहिजे. नार्वेकर कोणत्‍याही पक्षात गेले की ते त्‍या पक्षनेतृत्‍वाच्या अगदी जवळ जातात. शिवसेनेत होते तेव्हा ते आदित्‍य ठाकरेंच्या जवळ होते. आमच्याकडे आले तेव्हा ते माझ्याजवळ होते. आता भाजपत ते देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ आहेत. मला तर मूळ भाजपमधील मंडळींचे वाईट वाटते. आमच्याकडची मंडळीच भाजपमधील मूळ लोकांना बाजूला सारून पुढे आली आहेत. इथे विधानसभेतच पहिल्‍या रांगेत बघा ना. बहुतेक सगळे मूळ आमच्याकडचेच आहेत. अध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव येईल, असे मला वाटत होते; पण भाजपमधील जुन्या लोकांना जे जमले नाही, ते नार्वेकरांनी फक्‍त तीन वर्षांत करून दाखविले आहे. आमचे दिपक केसरकर तर एकदम चांगले प्रवक्‍ते बनले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील, हे जाहीर केले तेव्हा तर राज्‍यभरात पीनड्रॉप सायलेन्स झाला. भाजपमधील मंडळी तर रडायलाच लागली. गिरीश महाजन यांचे तर रडणे अजूनही थांबलेले नाही. ते तर आपल्‍या फेट्याच्या कपड्याने अजूनही डोळेच पुसत आहेत, असे अजितदादा म्‍हणाले, तेव्हा तर सभागृहात एकच हशा पिकला.

अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोपरखळी लगावताना, ‘‘चंद्रकांत पाटील तुम्‍ही जास्‍त बाके वाजवू नका, तुम्‍हाला मंत्रीपद मिळणार नाही, अशीही चर्चा आहे. बरे या ३९ आमदारांनी जरी माझ्या कानात सांगितले असते तर मी उद्धवजींना मेसेज दिला असता की. मग कसलाच प्रॉब्‍लेम आला नसता. काय आदित्‍य?’’ असे अजितदादा गंमतीने म्‍हणाले. राहुल नार्वेकर यांना संसदीय कायद्याची उत्तम जाण आहे. तसेच ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर खऱ्या अर्थाने कायद्याची जाण असलेले अध्यक्ष आपल्याला मिळाले आहेत. विधानसभा अध्यक्ष म्हणून कायद्याचे पालन करत असताना दोन्ही बाजुंच्या सदस्याना संधी दिली पाहीजे, अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्‍त केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in