मुंबई : गेल्या तीन दशकांत पश्चिम घाटातील मातीची धूप जवळजवळ दुप्पट झाली आहे. त्यामुळे जैवविविधतेने समृद्ध या पर्वत रांगांमधील जैविक विविधता, कृषी उत्पादकता आणि पाण्याच्या गुणवत्तेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असा निष्कर्ष मुंबई आयआयटीने अलीकडेच केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे.
रिमोट सेन्सिंग डेटा वापरून मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी पश्चिम घाटाचे निरीक्षण केले. संशोधनात हवामानातील बदल तसेच या प्रदेशाच्या जमिनीच्या बिघडत चाललेल्या स्थितीसाठी जमिनीच्या गैरव्यवस्थापनाकडे लक्ष वेधले आहे. पश्चिम किनाऱ्यालगत गुजरातपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूपर्यंत १६०० किमी लांबीचा पश्चिम घाट आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आणि पृथ्वीवरील ३६ जैवविविधता हॉटस्पॉट्सपैकी एक असलेला पश्चिम घाट सुपीक माती, समृद्ध वनस्पती आणि केवळ याच भागात सापडणाऱ्या जीव-जंतूंसाठी ओळखला जातो.
मुंबई आयआयटीच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाजचे येथील सहयोगी प्राध्यापक पेन्नन चिन्नासामी आणि जागतिक बँकेच्या सल्लागार वैष्णवी होनप यांनी केलेल्या या अभ्यासात ओपन सोर्स जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम (जीआयएस) डेटा आणि युनिव्हर्सल सॉईल लॉसचा वापर करण्यात आला. पश्चिम घाटातील मातीची हानी मोजण्यासाठी पर्जन्यमान, स्थलाकृती, मातीची धूप, जमीन आच्छादन व्यवस्थापन आणि प्रचलित संवर्धन पद्धती यासह अनेक घटकांचा विचार करण्यात आला.
यात संशोधकांना असे आढळले आहे की, गेल्या ३० वर्षांत पश्चिम घाटातील सातही राज्यांमध्ये येथील सुपीक मातीचे आवरण नष्ट होत चालले आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सर्वाधिक धूप झाली आहे, तर कर्नाटकात सर्वात कमी म्हणजे ५६ टक्के नुकसान झाले आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ७९ टन प्रति हेक्टर मातीची धूप झाली, तर केरळमध्ये सर्वात कमी ४७.१३ टन प्रति हेक्टर मातीचे नुकसान झाले.
हे घटक कारणीभूत
अभ्यासात या परिस्थितीला हातभार लावणाऱ्या अनेक घटकांची यादी केली आहे. त्यात अलीकडच्या काही वर्षांत पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात चहा, कॉफी, रबर, पाम अशा पिकांची लागवड झाली आहे. तसेच रस्ते बनवण्यात आले आहेत. जनावरांच्या चराईसाठी जमिनीचा वापर वाढला आहे. त्यामुळे मातीच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
नवी धोरणे बनवणे आवश्यक
पश्चिम घाटातील माती पोषक घटकांनी समृद्ध आहे. तिचा दर्जा उच्च आहे. अशा उच्च दर्जाच्या मातीची मोठ्या धूप होणे हे इथल्या जैवविविधतेला धोका पोहोचवणारे आहे. मातीची अशीच धूप होत राहिली तर इथली जैवविविधता नष्ट होईल, असे संशोधकांना वाटते. त्यासाठी येथे पर्यटक आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्याची गरज आहे. तसेच पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी नव्याने धोरणे आखण्याची आवश्यकता आहे, असेही या अभ्यासात म्हटले आहे.