‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण यशस्वी

पहिल्या फेरीतच १०० टक्के टार्गेट फत्ते
‘विशेष मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण यशस्वी

मुंबई : गोवर, रुबेलावर मात करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पहिल्या फेरीतच लसीकरणाचे १०० टक्के टार्गेट फत्ते केले आहे. ७ ते १२ ऑगस्टदरम्यान राबवलेल्या विशेष मोहिमेत २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेची दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे.

डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रुबेलावर मात करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृती दल व मुंबईतील सात अतिजोखीमग्रस्त विभागांची बैठक घेण्यात आली होती. तसेच २४ प्रशासकीय विभाग स्तरावर विभाग कृती दल बैठक घेण्यात आली होती.

पहिल्या फेरीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत ० ते ५ वयोगटातील २,६३८ मुलांचे व ३०४ गरोदर मातांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २,८०६ बालकांचे व २९६ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहीमेत अंगणवाडी सेविकांचा तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशिअनचा सहभाग होता.

नियमीत लसीकरणालाही प्रतिसाद!

याच कालावधीत नियमित लसीकरणाचा विचार करता एकूण १,४०६ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ० ते ५ वयोगटातील ११,५३९ बालकांचे व १,२०० गरोदर मातांचे नियमित लसीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in