कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालणारी स्पर्ट कार दाखल

कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालणारी स्पर्ट कार दाखल

रेल्वेच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध तंत्रज्ञान अंमलात आणण्यात येत आहे. नुकतेच कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालणारी स्पर्ट कार दाखल झाली आहे. रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पर्ट कार रेल्वे रुळावरून चालत रुळांची तपासणी करणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

केंद्र सरकार राज्य सरकारला सोबत घेत विविध प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने मार्गी लावत आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे मार्गावर नव्या ३६ रेल्वे सुरू करण्यात आल्या. यात बहुतांश एसी लोकलचा समावेश आहे. तर गेल्या ७ वर्षांत मुंबईत मेट्रोचा देखील विस्तार वेगात केला गेला. मुंबई उपनगरांमध्ये देखील मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. दरम्यान, ‘वंदे भारत’ रेल्वेचे स्वदेशी विस्टाडोम कोच भारतात तयार करण्यात येत आहेत. रेल्वेच्या विविध प्रकल्पांचा आलेख उंचावत असताना कोकण रेल्वेने देखील आपल्या कामात अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण जवळपास पूर्ण झाले असताना आता कोकण रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळांची तपासणी करण्यासाठी अनोखे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. रुळावरून चालणारी स्पर्ट कार नुकतीच रेल्वे प्रशासनाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

ऑस्ट्रेलियात बनलेली ही कार एप्रिलच्या अखेरीपासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाली आहे. रेल्वेच्या रुळातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाकडून या कारचा उपयोग केला जात आहे. सध्या ही कार कोकणातील कणकवलीत दाखल झाली आहे. रोहा ते कणकवलीपर्यंतचे रेल्वे रूळ तपासणी या कारद्वारे केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in