धुळ नियंत्रणासाठी रोज ३ लाख लीटर पाण्याची फवारणी ;शिवाजी पार्क मैदानातील ३५ रिंगवेल मधील पाण्याचा वापर

कायमस्वरुपी धूळ प्रदूषण रोखण्याकरीता कामे करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे.
धुळ नियंत्रणासाठी रोज ३ लाख लीटर पाण्याची फवारणी ;शिवाजी पार्क मैदानातील ३५ रिंगवेल मधील पाण्याचा वापर

मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदान येथील धुळीमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी दररोज २ लाख ९० हजार लीटर पाण्याची फवारणी करण्यात येते. यासाठी मैदानातील ३५ रिंगवेल विहिरीतील उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा वापर केला जातो आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरील धुळीच्या नियंणासाठी या मैदानावर बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तुषार सिंचन प्रणाली प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पामध्ये पर्जन्य जल पुनर्वापर (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रणाली वापरून ३५ नवीन रिंग विहिरी तयार करण्यात आल्या. मैदान समतल करण्यात आले. यासह विविध कामे स्थानिक रहिवाशांसोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीन्वये व तज्ज्ञ सल्लागारांच्या सल्ल्याने करण्यात आले आहे. सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये प्रतिदिन पाणी फवारण्याकरीता सुमारे २,९०,००० लीटर पाण्याची आवश्यकता असते. मैदानावरील धूळ प्रदूषण थांबवून स्थानिक रहिवाशांना धुळीचा त्रास होवू नये म्हणून सदर मैदानात असलेल्या ३५ रिंगवेलमधील उपलब्ध पाणी संपूर्ण मैदानात फवारण्यात येते. तसेच मैदानावरील हिरवळीचे आच्छादन वाढवले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिवर्षाप्रमाणे ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अनुयायांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात व्यवस्था करण्यात येते. त्याची पूर्वतयारी कामे लवकरच सुरू केली जाणार आहेत. महापरिनिर्वाण दिनाचे कामकाज झाल्यानंतर धूळ प्रदूषण विषयक कामे हाती घेण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सल्लागाराच्या सल्ल्यानुसार काम होणार!

कायमस्वरुपी धूळ प्रदूषण रोखण्याकरीता कामे करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक केली जाणार आहे. या सल्लागारामार्फत सुचविण्यात आलेल्या सूचना, उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येईल, अशा मोठ्या स्वरुपाचे होणारे काम विविध खात्यांचा समावेश करून त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in