एसटी महामंडळाचे जादा वाहतुकीचे नियोजन कोलमडले, आरक्षित गाड्या उशिरा आल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

एसटी महामंडळाचे गुरुवारचे जादा वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
एसटी महामंडळाचे जादा वाहतुकीचे नियोजन कोलमडले, आरक्षित गाड्या उशिरा आल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
Published on

मुंबई : एसटी महामंडळाचे गुरुवारचे जादा वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या कोकणातील चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. आरक्षित केलेल्या एसटी तब्बल सहा-सात तास उशिराने आल्याने प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. ऐन गणेशोत्सव काळात आंदोलन केल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. गुरुवारी कोकणात जाणाऱ्या एसटी बस मुंबईतून वेळेत न सुटल्याने, कुटुंबीयांसह निघालेल्या प्रवाशांना बराच काळ आगार, बस स्थानकात उभे राहावे लागले. मात्र राजकीय पक्षांनी आरक्षित केलेल्या एसटीला प्राधान्य देण्यात आल्याने गट आरक्षण केलेल्या प्रवाशांनी आक्षेप नोंदवला. त्यामुळे काही वेळ दोन गटात बाचाबाची झाली. दहिसर, बोरिवली या परिसरातून बस अनिश्चित वेळेत येत असल्याने,

प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी मुंबई, पालघर, ठाणे विभागातून ३,६१८ जादा एसटी सोडण्याचे नियोजन होते. त्यानुसार रात्री ८ वाजेपर्यंत २,८०० एसटी सोडण्यात आल्या. तर, उर्वरित बस रात्री उशिरापर्यंत सोडल्या. दादर येथील सेनापती बापट मार्गावरून १९६ बस कोकणासाठी रवाना करण्यात आल्या. शुक्रवारी मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून कोकणात २७६ एसटी चालवण्याचे नियोजन होते.

logo
marathi.freepressjournal.in