
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी तब्बल सहा महिने एसटी संप सुरू होता. संप न्यायालयीन निकालानंतर मागे घेण्यात आला असला तरी काम नाही, पगार नाही या तत्त्वानुसार संपकाळात कामावर हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन न काढण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र असे असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात ६१ कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी तब्बल ३३ लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसटीच्या अकोला विभागातील बड्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी नोव्हेंबरपासून संपावर होते. अकोला विभागातील नऊ आगारांमधील कर्मचारीही संपात सहभागी झाले होते.
दरम्यान, गैरहजर असतानाही अकोला आगारातील अधिकाऱ्यांच्या दिलदारपणामुळे तब्बल ६१ कर्मचाऱ्यांना संपकाळातील वेतन त्यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आले आहे. संपकाळातील पगार देण्याचा प्रश्नच नाही, याबाबत स्पष्ट सूचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या होत्या.