धारावी पुनर्विकास केंद्राच्या असहकार्यामुळे रखडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत हल्लाबोल

धारावी पुनर्विकास केंद्राच्या असहकार्यामुळे रखडला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधानसभेत हल्लाबोल

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची तयारी झाली असतानाही केवळ रेल्वेच्या जमिनीसाठी राज्य सरकारने पैसे भरूनही केंद्र सरकारने जमिनीचा ताबा न दिल्याने हा प्रकल्प रखडला असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

‘मुंबईचा सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ असाच विचार आजवर केला गेला. ही कोंबडी सोन्याचे अंडे देत आहे व लोक ते घेऊन जात आहेत. पण त्या कोंबडीची निगा कोण राखणार हा मुद्दा होता. ती निगा राखण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने हाती घेतले आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केलेले गिरणी कामगार, झोपड्यांत राहणारे कष्टकरी यांचा विचार आमच्या सरकारने गांभीर्याने केला. त्यामुळेच देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे भविष्यातील रूप कसे असावे यासाठी राज्य सरकारच्या गृहनिर्माण, नगरविकास आदी विविध विभागांकडून प्रकल्प राबवण्यात येत आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत अनेकजण अन्न, वस्त्र, निवारा शोधतात, त्यांना अन्न-वस्त्र मिळते. पण दिवसभर काम केल्यानंतर पाठ टेकायला त्यांच्याकडे स्वत:चे घर नसते. शिवसेनाप्रमुखांनी १९९५ मध्ये युतीची सत्ता आल्यावर या झोपडपट्टीवासियांना हक्काचे मोफत घर देण्याचा विचार मांडला व त्या दिशेने काम सुरू केले. त्यानंतरही अनेक झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू होऊनही त्याची गती कासवगतीपेक्षा मंद राहिली. त्यामुळे लोकांना संक्रमण शिबिरांत वर्षानुवर्षे राहावे लागत आहे. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी अभय योजना लागू करत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. त्याचबरोबर या प्रकल्पांत लूट केलेल्या विकासकांची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मुंबई स्वच्छ राहण्यासाठी काम करणाऱ्या सफाई कामगारांना हक्काची घरे महाविकास आघाडी सरकारच्यावतीने दिली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.