
मुंबई : मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत रुग्णसेवा केली. आता त्यांचीच चौकशी केली जात असून, त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे चौकशीचा ससेमीरा त्वरित थांबवा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंता यांनी आझाद मैदानात धडक दिली.
कामगार - कर्मचारी, अधिका-यांना मारहाणीच्या घटनांत वाढ होत आहेत. अशा प्रकारांना वचक बसण्यासाठी असलेले ३३२ व ३५३ कलम रद्द करण्याची मागणी यावेळी लावून धरली. मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शेकडो कर्मचारी, अभियंते, अधिका-यांनी आझाद मैदानात मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी कामगारांना संरक्षण देणाऱ्या कलम ३३२ व ३५३ कलम रद्द करण्याची एकमुखी मागणी केली आहे. सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच महानगर पालिकेतील कामगार- कर्मचा-यांना आपले कर्तव्य बजावत असताना मारहाण केली अथवा कर्तव्यात अडथळा निर्माण केला तर त्यांच्यावर त्वरीत ३३२ व ३५३ कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येते. काही दिवसांपूर्वी एका अभियंत्याला मारहाण झाली. या आधीही मारहाणी, कर्तव्य पार पाडण्यास दबाव आणण्याच्या घटना घडल्या आहेत. याला वचक बसण्यासाठी ही कलमे आहेत. ही कलमेच रद्द करण्याचा डाव आखला जातो आहे. त्यामुळे आमदारांची या मागणीला मान्यता देऊन सरकारने कलम रद्द केल्यास भविष्यात मारहाणीच्या घटना वाढतील व कामगार- कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावणे कठीण जाईल. कामगारांना संरक्षण देणारे कलम रद्द करण्याचा डाव सरकारचा आहे. या विरोधात बुधवारी पालिकेतील कामगार, कर्मचारी, अभियंते, अधिकारी एकत्र येऊन आझाद मैदानात मोर्चा काढला.
कामगारांसाठीचे कलम रद्द करण्याची आमदारांची मागणी मान्य नये
कामगारांसाठी असलेले हे कलम रद्द करण्याची आमदारांची मागणी मान्य करू नये, कोविड काळातील यंत्रणाच्या चौकशीचा ससेमिरा थांबवा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांकडे मोर्चा काढून लक्ष वेधण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आल्याचे समन्वय समितीचे बाबा कदम, अशोक जाधव, साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.