यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाची काटेकोर अंमलबजावणी गरजेची

यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाची काटेकोर अंमलबजावणी गरजेची

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याबरोबरच रोग, किडीचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी केले. त्याचबरोबर आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारे बियाणे शेतकरी बांधवाना मोफत देण्यात येत असून शेतकऱ्यांचा आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.

‘राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२२’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, कृषी विद्यापाठांचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्याचा पीक विमा समाधानकारक नसल्याने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी खते कमी दरात वेळेत मिळण्यासाठी कृषी विभागाने केंद्र सरकारच्या संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या. ‘‘यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करावे. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो. त्यासाठी या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल; मात्र राज्यातील शेतकरी बांधवांना खते, बियाणे वेळेत मिळाली पाहिजेत,’’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियांणांचा पुरवठा करण्याबरोबर कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, याची दक्षता घेतल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले. ‘‘सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाणांची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन केले आहे. राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्वाचा घटक असल्याने त्यावर भर देण्यात येत आहे,’’ असेही भुसे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in