मुंबई : विविध कारणांनी लोकल सेवेचा खोळंबा, लोकलच्या गर्दीवर कोणताही तोडगा रेल्वे प्रशासनांकडून काढण्यात येत नसल्याने हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष्य वेधण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार २२ ऑगस्ट रोजी प्रवाशांनी शुभ्र वस्त्र परिधान करून हे शांततापूर्ण आंदोलन करण्याची तयारी केली आहे.
पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. विविध कारणांनी विस्कळीत होणाऱ्या लोकलमुळे ऐन गर्दीच्या वेळे दरम्यान, प्रवाशांचे हाल होत आहेत. यातच एमयुटीपीमधील प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले आहेत. यामुळे कर्जत, कसारा, विरार आणि पनवेलवरून मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या प्रवाशांना गर्दीतून घुसमटत प्रवास करावा लागत आहे.
रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत, यासाठी प्रवासी संघटनांनी आंदोलने, निवेदने दिल्यानंतरही काही प्रगती होत नसल्याने लाखो प्रवाशांचे हाल कायम आहेत. यामुळे प्रवाशांचा आणि संघटनांचा संयम सुटल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन हाती घेतले आहे.
यानुसार २२ ऑगस्ट रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांनी लोकल प्रशासनाच्या निषेध म्हणून शुभ्र वस्त्र घालून लोकलने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रवाशांना केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य तसेच अन्य मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत आहे. मध्य रेल्वेवर लोकल तब्बल ५० मिनिटांपर्यंत विलंबाने धावत आहे.
अनियमित वेळापत्रकाबरोबरच लोकल व फलाटावरील वाढत्या गर्दीमुळे जखमी व मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
१५ डब्यांच्या गाड्या नाही; एसी लोकलची मात्र चैन…
तिन्ही रेल्वे मार्गावरील प्रवाशांना गेले अनेक वर्षांपासून लोकलच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर अधिक त्रास होत नसला तरी पावसाळ्यात लोकलचा वेग मंदावतो. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये शिरायलाही जागा नसते. तुलनेत मध्य रेल्वेची हद्द अधिक असल्याने प्रवाशांना मध्य आणि हार्बर मार्गावर प्रवास करताना अधिक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावरील १५ डब्याच्या दोन लोकलपैकी एक लोकल कित्येक दिवसांपासून बंद आहे. तर एसी लोकलची मागणी नसतानाही अधिक एसी लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येत आहे. विविध कारणांमुळे लोकलचा खोळंबा नित्याचा आहे.
गर्दीमुळे प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ
वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना होत आहेत. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी मंत्र्यांसह प्रशासनाच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. तसेच नवनियुक्त खासदारांना निवेदने दिली आहेत. मात्र लोकलचा सावळागोंधळ थांबलेला नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली कित्येक वर्षांपासून सुरू असलेला मेगाब्लॉक अजूनही सुरूच आहे. अशावेळी लोकलचा वेग वाढत नाही.