
मुंबई : तीन दिवसांपूर्वी जोगेश्वरीतील एका बांधकाम साईटवरील सेफ्टी टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीच्या झालेल्या हत्येची उकल करण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे. मृताची ओळख पटली असून त्याचे नाव चरका पुजहर असून त्याच्या हत्येप्रकरणी त्याचाच सहकारी केला चरका राय याला पोलिसांनी अटक केली आहे.
गावी जाण्यावरुन झालेल्या वादातून केलाने चरकाची हत्या करून त्याचा मृतदेह सेफ्टी टाकीमध्ये टाकून हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे. ३ ऑगस्टला जोगेश्वरीतील एस. व्ही रोडच्या एका बांधकाम साईटच्या सेफ्टी टाकीमध्ये पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने मारेकर्याने त्याचा मृतदेह सेफ्टी टाकीमध्ये टाकून पलायन केले होते. या व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. यावेळी अंधेरी पोलीस ठाण्यात बांधकाम साईटवरील दोन कर्मचारी मिसिंग असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या दोघांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक व्यक्ती चरका पुजहर असल्याचे उघडकीस आले. हत्या झालेली व्यक्ती चरका असल्याचे नंतर उघडकीस आले होते. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन जाधवर यांच्या पथकातील गणेश गायके, संदीप पाटील, शिंदे, रवी पाटील, गिते, बोबडे, बोराटे यांनी त्याचा दुसरा सहकारी केला राय याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच चरकाची हत्या केल्याचे उघडकीस आले होते. ते दोघेही मूळचे झारखंडचे रहिवाशी असून मुंबईतील बांधकाम साईटवर कामगार म्हणून कामाला होते. गेल्या आठ दिवसांपासून ते दोघेही साईट सोडून आले होते. त्यांच्याकडे राहण्याचे तसेच खाण्याचे पैसे नव्हते. साईटवर परत जाण्याचा जाण्याचा रस्ता मिळत नव्हता. फेरफटका मारताना ते दोघेही जोगेश्वरी येथे आले. तिथे त्यांच्यात गावी जाण्यावरुन वाद झाला होता. या वादानंतर केलाने चरकाच्या डोक्यात बांबूने मारहाण केली. तो निपपित पडल्याने त्याने त्याला सेफ्टी टँकमध्ये टाकून तेथून पलायन केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांन हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.