मुंबई - जोगेश्वरी येथे ममता अंकित तिवारी (२५) या गर्भवती महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्या पाचजणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा आरोपी पती अंकित जयप्रकाश तिवारी याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडी आहे.
या गुन्ह्यांत सासू नगीनादेवी जयप्रकाश तिवारी, सासरे जयप्रकाश तिवारी, दोन नणंद विनिता तिवारी आणि अंकिता तिवारी यांना ‘वॉण्डेट’ आरोपी दाखवले आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. मिथिलेश सत्यनााम दुबे हा तरुण कांदिवलीत राहतो. तो बोरिवलीतील एका वैद्यकीय कंपनीत औषध वितरक म्हणून कामाला आहे. २००९ साली त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याची आई व लहान भाऊ उत्तरप्रदेशात राहतात. त्याची ममता ही बहिण असून तिचा अंकितसोबत विवाह झाला होता. लग्नाच्या वेळेस तिवारी कुटुंबियांनी त्यांच्याकडे अडीच लाखांचा हुंडा मागितला होता. त्यापैकी १ लाख ८०२ हजारासह लग्नातील सर्व घरगुती सामान त्यांनी त्यांना दिले होते. लग्नात हुंड्याची पूर्ण रक्कम न दिल्याने तिचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरु होता. ते तिला सतत माहेरहून उर्वरित सत्तर हजार रुपये आणण्यास सांगत होते. मे महिन्यांत उत्तरप्रदेशातून तिवारी कुटुंबिय त्यांच्या जोगेश्वरीच्या जोखंड यादव चाळीत राहण्यासाठी आले होते. तेव्हापासून पतीसह सासरचे मंडळी तिचा सतत हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करत होते.
याबाबत तिने तिच्या भावाला फोनवरुन सर्व माहिती दिली. त्यानेही तिला ऑनलाईन रक्कम पाठवण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान मिथिलेशला ममता ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले होते. तरीही ते सर्वजण तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण करत होते. तिला औषधोपचाराला पैसे देत नव्हते. हुंड्याच्या पैशांवरुन सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक शोषणाला ममता ही प्रचंड कंटाळली होती. त्यामुळे नैराश्यातून तिने रविवारी तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ममताला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर मिथिलेश दुबे याची पोलिसांनी जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीत त्याने ममताचा पतीसह इतर चौघांविरुद्ध हुंड्यासाठी ममताचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली. यानंतर पोलिसांनी तिचा पती अंकित तिवारी, सासू नगीनादेवी, सासरे जयप्रकाश आणि दोन नणंद विनिता आणि अंकिता तिवारी यांच्याविरुद्ध हुंड्यसाठी छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.