मुंबई : केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर आदिनाथ पाटील (२४) याने रविवारी रात्री आत्महत्या केली. विषारी इंजेक्शन घेऊन त्याने जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र, मानसिक नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाते. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी एडीआरची नोंद करून तपास सुरू केला आहे.
आदिनाथ हा मूळचा जळगावचा रहिवाशी असून, तो सध्या मेडिसीन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचे वडीलही व्यवसायाने डॉक्टर असून, आदिनाथने वैद्यकीय क्षेत्रात त्याचे करिअर करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी त्याला मेडिकलमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. त्याची नेमणूक सध्या केईएम रुग्णालयात होती, मात्र मेडिसीन विभागाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्याला शिवडीतील टीबी रुग्णालयात नियुक्त करण्यात आले होते. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सोयीसुविधा नसल्याने डॉक्टरांना अनेक समस्या सहन कराव्या लागत होत्या.
रविवारी रात्री आदिनाथची नाइट शिफ्ट होती. यावेळी त्याने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोलिसांना एक सीरिंज, औषधाच्या बाटल्या सापडल्या आहेत, मात्र पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे आदिनाथने आत्महत्या का केली, याचा उलगडा होऊ शकला नाही. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. त्याच्या पालकांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून आदिनाथच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.