
सत्तांतरानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांमधील अंतर्गत कुरबुरीदेखील बाहेर येऊ लागल्या आहेत. राज्यातील सत्तांतराआधी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. काँग्रेसने २९चा कोटा ठेवला असताना हंडोरे यांना २२ मते मते पडली. काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे ४४ आमदारांची मते होती. काँग्रेस हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसरे उमेदवार भाई जगताप यांना मिळणार होती. मात्र या निवडणुकीत भाई जगताप विजयी होऊन हंडोरे यांचा पराभव झाल्याने काँग्रेस आमदारांनीच पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे दलित समाजात चुकीचा संदेश गेला आहे. हंडोरे यांना केवळ २२ मते पडली, सात जणांनी भाजपला मतदान केल्याने हंडोरे यांचा पराभव झाला, याची गंभीर दखल घ्या, अशी मागणी प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे करण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. भाजपला मते दिली असतील तर हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा त्याचा अर्थ निघतो. प्रकरण दडपून टाकले तर बेशिस्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी आपल्याला अपक्ष आमदारांची मते मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हिप झुगारला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.