आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास ‘टँकर फिलिंग पॉइंट’

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी २४ तास ‘टँकर फिलिंग पॉइंट’

शहर आणि उपनगरांत लागणाऱ्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी आता ५० ठिकाणी २४ तास ‘टँकर फिलिंग पॉइंट’ उपलब्ध केले जाणार आहेत. यातील ३६ ठिकाणी ३२ टँकर अॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. एका टँकरमध्ये १४ हजार लिटर पाणी असणार आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी व आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी टँकर फिलिंग पॉइंट महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईत आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दाटीवाटीच्या किंवा उंच इमारतीच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला अडचणी येतात. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याचा मारा वेगाने करावा लागतो. यासाठी जुन्या विहिरी, बोअरवेल, हायड्रंट आदींवर टँकर फिलिंग पाँइंट बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. याअंतर्गत मुंबईतील काही ठिकाणचे जलस्रोत अग्निशमन दलाने नकाशावर आणले आहेत. आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी टँकर फिलिंग पॉइंट अंतर्गत जलस्रोतांचा शोध अग्निशमन दलाने सुरू केला आहे; मात्र जुन्या विहिरी आटल्य़ा आहेत, तर सुमारे १० हजार ८४३ वॉटर हायड्रंट असून त्यापैकी एक हजार ३५३ हायड्रंट सुरू आहेत. उर्वरित नऊ हजार २९० निकामी झाले आहेत. काही जमिनीत गाडले गेले असून काही विकास प्रक्रियेत नष्ट झाली आहेत. तशीच स्थिती विहिरी आणि बोअरवेलची आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागतो. आग विझवण्यासाठी वापरलेले पिण्याचे पाणी वाया जाते.

सध्या जलस्रोतांची पुरेशी माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जलस्रोतांचे नकाशे तयार करून त्यांच्या निश्‍चित ठिकाणांची आणि स्थितीची माहिती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार सध्या ज्या विहिरी, बोअरवेल अस्तित्वात आहेत. त्याचे पाणी आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी टँकर फिलिंग पॉइंट अंतर्गत जलस्रोतांचा शोध अग्निशमन दलाकडून घेतला जात आहे; मात्र यासाठी विलंब लागणार आहे. त्यामुळे सध्या फायर फायटिंगसाठी मुंबईत ५० ठिकाणी टँकर फिलिंग पॉइंट उपलब्ध केले जाणार आहेत. यासाठी प्रशासनाने मंजुरीही दिली आहे. त्यामुळे यातील ३६ ठिकाणी ३२ टँकर अॅक्टिव्हही करण्यात आले आहेत. हे २४ तास उपलब्ध असणार आहेत, त्यामुळे फायर फायटिंग करताना याचा फायदा होईल, अशी माहिती अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली.

कोट-

फायर फायटिंगसाठी मुंबईत ३६ ठिकाणी ‘टँकर फिलिंग पॉइंट’ बसवण्यात आले आहेत. जुन्या विहिरी, बोअरवेलमधून पाणी घ्यायचे असेल तर तेवढ्या वेगाने पाणी मिळणे शक्य नाही. त्यामुळे २४ तास ‘टँकर फिलिंग पॉइंट’ तयार असतील. यातून १४ हजार लिटर पाणी तत्काळ उपलब्ध होणार असल्याने आग विझवण्यासाठी मदत होणार आहे. - राजेंद्र चौधरी, तांत्रिक सल्लागार, अग्निशमन दल

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in