
एकीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीने महामोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये (Thane Bandh) आणि डोंबिवलीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संतांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात बंद पुकारण्यात आला. तसेच, सुषमा अंधारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांच्या विरोधात ठाण्यातील वारकरी संप्रदायाने लॉंगमार्चही काढला.
ठाण्यामध्ये दुकानांसह बस, रिक्षादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. हा निर्णय सर्व हिंदुत्ववादी संघटना, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने घेतला होता. मात्र, या बंदमुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसला. रिक्षा बंद असल्याने बससाठी लांबच लांब रंग ठाणे, डोंबिवलीत पाहायला मिळाले. ठाणे, डोंबिवलीमधील या बंदला या बंदमध्ये बजरंग दल, सर्व हिंदुत्ववादी संघटना, ज्वेलर्स संघटना, रिक्षा संघटना यांनी पाठिंबा दर्शविला. मात्र, या बंदला मनसेने डोंबिवलीत विरोध केला. सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा आमच्याकडूनही निषेधच आहे. पण, बंद करून जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य? असा सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला. तसेच, हा बंद मागे घ्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली होती.