मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रिटीकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार आहे. कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोचमार्गाचे देखभाल, दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सामंजस्य करार कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे महामंडळअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या कामांना राज्य शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे.