मंत्रिमंडळ विस्‍तारात उत्‍तर महाराष्‍ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप

कोकणातील दोघांचा समावेश असून, मराठा समाजाच्या सात जणांना विस्‍तारात स्‍थान देण्यात आले आहे.
 मंत्रिमंडळ विस्‍तारात उत्‍तर महाराष्‍ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्‍तारात उत्‍तर महाराष्‍ट्र आणि मराठवाड्याला झुकते माप देण्यात आले आहे. आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्‍ला मानल्‍या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्‍ह्याला तीन मंत्री मिळाले आहेत. कोकणातील दोघांचा समावेश असून, मराठा समाजाच्या सात जणांना विस्‍तारात स्‍थान देण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक मंत्री औरंगाबादचे झाले आहेत. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची शिंदे गटाकडून तर भाजपने अतुल सावे यांची वर्णी लागली आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले संजय शिरसाट यांच्या पदरी मात्र निराशा आली. उत्‍तर महाराष्‍ट्रालाही झुकते माप देण्यात आले असून, १८ पैकी सर्वाधिक पाच मंत्री हे उत्तर महाराष्ट्राचे आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. अहमदनगर, नाशिक आणि नंदुरबारलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यापाठोपाठ चार मंत्री हे मराठवाड्याचे आहेत. तीन मंत्री तर एकट्या औरंगाबादचे असून, तानाजी सावंत यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला स्थान मिळाले आहे.

कोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांना संधी मिळाली आहे. पश्चिम महाराष्ट्राला चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे आणि शंभुराज देसाई यांच्या रूपाने तीन मंत्री मिळाले आहेत, तर विदर्भातून भाजपने सुधीर मुनगंटीवार आणि शिंदे गटाने संजय राठोड अशा दोन मंत्र्यांना संधी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in