दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ अवैध,संजय राऊत यांची नव्या सरकारवर जोरदार टीका

मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांच्या घटनात्मक वैधतेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.
दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ अवैध,संजय राऊत यांची नव्या सरकारवर जोरदार टीका

नवे सरकार स्थापन होऊन १५ दिवस उलटून गेले, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्त दोनच मंत्री असल्याने त्यांनी घेतलेले निर्णय अवैध असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४(१अ)चा दाखला देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांनी सवाल केला आहे की, ‘राज्यपाल, हे काय सुरू आहे?’.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून शनिवारी जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या नव्या विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता; पण हे सर्व निर्णय राज्यपालांकडून बहुमत सिद्ध करण्याची नोटीस आल्यानंतर घेतले गेल्याने ते वैध नाहीत, असा दावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केला होता, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मविआ सरकारच्या कॅबिनेटमधील सर्व निर्णय रद्द केले. त्यानंतर शनिवारी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तेच निर्णय घेतले; पण त्यांच्या या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयांच्या घटनात्मक वैधतेवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे.

घटनेनुसार किमान १२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ असणे बंधनकारक

“भारतीय राज्यघटनेच्या कलम १६४ (१अ) नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान १२ मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले दोन आठवडे महाराष्ट्रात दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही. राज्यपाल, हे काय सुरू आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करून राज्यपालांना खिंडीत पकडले आहे.

‘एक दुजे के लिये’ राज्यात सिनेमा सुरू

‘उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ‘एक दुजे के लिए’ आहेत. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा सुरू आहे आणि या सिनेमाचा शेवट काय झाला हे आपल्याला माहिती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in