केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात केले बदल
केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केले आहेत. ज्यामध्ये नव्या नियमांचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार आहे. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे नवे ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या सुधारित नियमानुसार, आता आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून १ जुलै २०२२ पासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स शिकवण्याचा अभ्यासक्रम मंत्रालयाने तयार केला आहे. हे सिद्धांत आणि व्यावहारिक अशा दोन भागात विभागलेले आहे. लाइट मोटर व्हेईकल या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडे आहे, जो २९ तास चालेल. तर प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, गावातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग इत्यादींवर प्रॅक्टिकलसाठी २१ तास द्यावे लागतील. उर्वरित ८ तास थिअरी शिकवली जाणार आहे. दरम्यान, यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये लायसन्ससाठी नोंदणी करत ट्रेनिंगनंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल प्रमाणपत्र देईल. या प्रमाणपत्राच्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स तयार केले जाणार आहे.
प्रशिक्षण केंद्रासाठी मार्गदर्शक तत्त्वे :
- दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा.
- अवजड प्रवासी/माल वाहने किंवा ट्रेलरसाठी प्रशिक्षण केंद्राजवळ दोन एकर जागा असणे आवश्यक आहे.
- प्रशिक्षकासाठी किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे.
- किमान ५ वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा.
- ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम सिद्धांत आणि व्यावहारिक 2 भागांमध्ये विभागलेला आहे.
- प्रशिक्षण केंद्रात बायोमेट्रिक यंत्रणा असणे आवश्यक आहे.
- मध्यम आणि अवजड वाहन मोटार वाहनांसाठी अभ्यासक्रमाचा कालावधी 6 आठवड्यात 38 तासांचा आहे.
- थिअरी क्लासचे ८ तास आणि प्रॅक्टिकलचे ३१ तास असतील.