प्लास्टिकमुक्त रेल्वे स्थानकांचा संदेश देणारे मध्य रेल्वे ठरतेय घातक प्लास्टिकदूत

मध्य रेल्वेवर सर्वाधिक प्लास्टिक बॉटल कचरा; थाटात सुरु केलेल्या बॉटल क्रश मशिन्स धूळ खात पडून
प्लास्टिकमुक्त रेल्वे स्थानकांचा संदेश देणारे मध्य रेल्वे ठरतेय घातक प्लास्टिकदूत

उपनगरीय रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांदरम्यान अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामध्ये मध्य रेल्वेवर सर्वाधिक प्लास्टिक कचरा आढळून येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासन प्लॅस्टिक कचऱ्याचे विंघटन करण्याचे आवाहन प्रवाशांना करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला स्वतःच 'मेघदूत'द्वारे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना देत प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढवत असल्याचे दिसून येत आहे. केवळ स्वच्छता पंधरवडा आला की स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या मध्य रेल्वेवर सर्वाधिक प्लास्टिक कचरा आढळण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे ''प्लास्टिक बॉटल क्रश मशिन्स''. दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर १४ मशिन्स बसवण्यात आल्या. मात्र या मशिन्स कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. परिणामी प्लास्टिकमुक्त रेल्वे स्थानकांचा संदेश देणारेच प्लास्टिकदूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.        

लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोरील आव्हान ठरते. मध्य रेल्वे क्षेत्रात गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मध्य रेल्वेवर एका दिवसात जवळपास ८०० ते ९०० किलो इतका कचरा गोळा होत असून त्यामध्ये प्लास्टिक बाटल्यांचा सर्वाधिक ढीग असल्याचे पर्यावरणप्रेमी संस्थांकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वे स्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर बॉटल क्रश मशिन्स बसविण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या प्रमुख १८ रेल्वे स्थानकांवर ३५ बॉटल क्रश मशिन्स बसविण्यात येणार होत्या. मात्र मधल्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेचा वेग मंदावत सद्यस्थितीत मध्य रेल्वेचा ११ स्थानकांवर केवळ १४ मशीन्स उपलब्ध आहेत. दुर्दैव म्हणजे मोठ्या दिमाखात सुरु करण्यात आलेल्या या मशिन्स मागील कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून असल्याने प्रवाशांकडून प्लास्टिक बॉटल, खाद्यपदार्थाचे रॅपर्स सहजपणे रेल्वे रुळांवर, रेल्वे डब्यात टाकण्यात येत आहे. कोरोना शिथिलतेनंतर गेल्या काही महिन्यापासून रेल्वेमधील प्रवासी संख्या पुन्हा वाढल्याने स्थानकातील तसेच रेल्वे रूळांवरील प्लास्टिक कचर्‍यात देखील कमालीची वाढ झाली आहे. परिणामी प्लास्टिक कचरा टाळण्यासाठी, प्लास्टीचे योग्य विघटन होण्यासाठी गर्दीच्या स्थानकांवर उर्वरित बॉटल क्रश मशिन्स लावण्यात याव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.  

सुविधा मोफत मिळाल्याने मध्य रेल्वेकडून देखभाल दुरुस्ती नाही 

उपनगरीय रेल्वेवर सामाजिक जाणिवेतून सीएसआर म्हणजेच सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. अनेक सामाजिक संस्था यावेळी एकत्र येत रेल्वे प्रशासनाला स्वच्छता, जनजागृती त्यासाठी सहकार्य करतात. अशाच एका उपक्रमावेळी मध्य रेल्वेला 'बॉटल क्रश मशिन्स' मोफत मिळाल्या. मशिन्स मिळाल्यानंतर दिमाखात मध्य रेल्वेकडून याचे महत्त्व आणि याचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. परंतु सद्यस्थितीत मागील कित्येक महिन्यांपासून या मशिन्स बंद असूनही याची देखभाल-दुरुस्ती मध्य रेल्वेकडून करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, याबाबत विचारले असता या मशिन्स एका उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेला मिळाल्या असून या मशिन्स सध्या चालू आहेत की बंद? त्याचा वापर होतो की नाही? याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे धक्कादायक विधान मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नाव न सांगण्याच्या अटींवरून करण्यात आले.   

प्लास्टिक कचऱ्याचा दुष्परिणाम 

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी आपल्याजवळील पाण्याची बाटली, वेफरची रिकामी पाकिटे आदी कचरा रेल्वे स्थानक आणि रेल्वे रुळांवरच टाकतात. त्यामुळे रेल्वे रुळ आणि स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा होतो. प्लास्टिकच्या कचर्‍याचे योग्य विघटन होत नसल्यामुळे रेल्वे रुळांमध्येच ते अडकून पडते.परिणामी पावसाळ्याच्या दिवसात हाच कचरा नाल्यांमध्ये पाणी तुंबण्यास कारण बनत लोकलच्या वाहतुकीवर परिणाम करतो. दरम्यान, स्वच्छता पंधरवड्या अंर्तगत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात येतो. मात्र एरवी कचरा जमा करण्याचे प्रमाण, दंडात्मक कारवाई याचे प्रमाण थंडावल्याने मध्य रेल्वे परिसरात दिवसेंदिवस प्लास्टिक कचर्‍यात देखील वाढ होत आहे.  

क्रश मशिन्स बहुतांश बंद आहेत. प्लास्टिक बॉटलशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. प्लास्टिक वापरावे की नाही याबाबत लोकांनी निर्णय घेणे आवश्यक आहे. मशिन्सबाबत माहिती घेऊन त्या सुरु करण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात येतील. 

ए. के. जैन, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल वापरण्यात येतात. सर्वाधिक कचरा तोच आढळून येतो. यासाठी रेल्वेने काहीतरी पर्याय उपलब्ध करणे अनिवार्य आहे. क्रश मशिन्स जास्तीत जास्त उपलब्ध करून प्लास्टिक बॉटल त्या मशीन्समध्ये टाकण्याचे प्रवाशांना आवाहन करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानकांवर स्वच्छ, नीटनेटक्या चांगल्या दर्जाच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध करत ग्लासने पाणी पिण्याची सुविधा ठेवावी

- शंकर सुतार, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक, निसर्ग संस्था  

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in