
दोन पिलरमधील अंतर १६० मीटर नसल्याने बोटींच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनालाही माहीत आहे की, दोन पिलरमधील अंतर कमी असल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने २० वर्षांचा विमा देण्याची घोषणा केली आहे. पालिकेच्या कुठल्याही भुलथापांना बळी पडणार नसून दोन पिलरमधील अंतर १६० मीटरचे असावे, अशी मागणी कायम आहे. पालिका प्रशासनाने याबाबत लवकरच मच्छीमारांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येणार असून, लवकरच आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येईल, असा इशारा अखिल महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिला.
२०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून मच्छीमार करणारे कोळी बांधव दोन पिलरमधील अंतर १६० मीटर ठेवा, अशी मागणी करत असून ती रास्त मागणी आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ठेवले असून बोटींना अपघात होण्याची शक्यता असल्याने विम्याची घोषणा केली आहे. समुद्र हा खवळलेला असतो. त्यामुळे दोन पिलरमधील अंतर १६० मीटर ठेवावे, अशी आमची मागणी असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी पाहणी करावी, त्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की, मागणी योग्य आहे की अयोग्य, असे तांडेल म्हणाले.
कोस्टल रोड प्रकल्पामुळे धनाढ्य लोकांना कोट्यवधी रुपये खर्च करत डिझाईनमध्ये बदल करत मॉर्निंग वॉकसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र मूळचा भूमिपुत्र कोळी बांधव हक्काच्या मागणीसाठी लढा देत आहे, ही मोठी शोकांतिका आहे, असेही तांडेल म्हणाले.