
येत्या रविवारी २२ मेपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन २०२२ ग्रँड स्लॅम स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला असून नोव्हाक जोकोविच या स्पर्धेत खेळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोविड-१९ लसीकरण न करण्याच्या निर्णयानंतर त्याला जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनआधी मेलबर्नमधून हद्दपार करण्यात आले होते.
जोकोविच २० वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन योशिहितो निशिओकाविरुद्ध आपल्या २१व्या विजेतेपदाच्या मोहिमेची सुरुवात करेल. पाचवा मानांकित नदालचा सलामीच्या फेरीत जॉर्डन थॉम्पसनचा सामना होईल, तर सहाव्या मानांकित अल्काराझचा सामना क्वालिफायरशी होईल. सर्वांच्या नजरा नदालवर असतील. त्याला क्ले-कोर्ट ग्रँड स्लॅमपर्यंत दुखपतींनी ग्रासले होते.
राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे एकाच हाफमध्ये असून संभाव्य उपांत्यपूर्व फेरीसाठी सज्ज असतील. नदाल आणि जोकोविच गेल्या वर्षी उपांत्यपूर्व लढतीत आमने-सामने आले होते ते पुन्हा उपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचा उपविजेता स्टेफानोस त्सित्सिपासचा सामना पहिल्या फेरीतील इटालियन लोरेन्झो मुसेट्टीविरुद्ध होणार आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या डॅनिल मेदवेदेवचा उपांत्यपूर्व फेरीत देशबांधव आंद्रे रुबलेव्हशी सामना होऊ शकतो, असा अंदाज आहे.
महिलांच्या ड्रॉनुसार चौथ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इगा स्विटेकचा सामना जेलेना ओस्टापेन्कोशी होण्याची शक्यता आहे. नाओमी ओसाका सलामीच्या सामन्यात २७व्या मानांकित अमेरिकन अमांडा अॅनिसिमोवाशी मुकाबला करील. विजेतेपदाची प्रबळ दावेदार इगा स्विटेकला शेवटच्या १६ मध्ये माजी चॅम्पियन जेलेना ओस्टापेन्कोचा सामना करावा लागणार आहे.